। सोलापूर । प्रतिनिधी ।
सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती ते वळसंग रस्त्यावर मंगळवारी (दि.24) सकाळी एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. देविदास दुपारगुडे, नितीन वाघमारे आणि हनुमंत राठोड अशी मृतांची नावे असून हे तिघेही बांधकाम कामगार होते. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजंदारीवर काम करणारे देविदास दुपारगुडे, नितीन वाघमारे आणि हनुमंत राठोड हे तिघे मंगळवारी सकाळी कामासाठी मुस्ती गावातून वळसंगकडे दुचाकीने निघाले होते. मात्र, रस्त्यात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की तिघेही रस्त्यावर पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे.






