बेभरवशी हवामान, शेतजमिनीवर कांदळवनांचे साम्राज्य
| उरण | वार्ताहर |
बेभरवशी हवामान, महागडी बियाणे -खते तसेच वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यात शेती करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस घटत चालले आहे.
तालुक्यातील बहूतांश शेतजमिन ही वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आणि गोदामांसाठी यापूर्वीच संपादित झाली आहे. सध्या तालुक्यात 2513 हेक्टर शेतजमिन शिल्लक राहिली आहे. तसेच शासनाच्या दुर्लक्षामुळे बांधिस्ती फुटल्याने खाडीकिनाऱ्यावरील शेतजमिनीवर संपूर्ण कांदळवन निर्माण झाले आहे. त्यामुळे काही शेतजमीन लागवडीखाली येत नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार उरण तालुक्यात निव्वळ पिकाखालील क्षेत्र हे 2 हजार 811 हेक्टर असून, 2 हजार 513 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे पिक घेतले जाते. यामध्ये भात-2 हजार 411 हेक्टर क्षेत्र, नागली 4.20 हेक्टर, तृणधान्य 0.36 हेक्टर, कडधान्य 48.05 हेक्टर आणि भाजीपाला 49.51 हेक्टर क्षेत्रावर पिकविला जातो. तर फळपिके 363.98 हेक्टर क्षेत्रावर फळ पिके घेतली जातात. यामध्ये आंबा 232.80, नारळ 83.22, काजू 4हेक्टर, चिक्कू 6.55 हेक्टर, इतर फळपिके 37.41 हेक्टरवर घेतली जातात.
दिवसेंदिवस तालुक्यातील शेती कमी होत असताना शासन तथा कृषी विभाग मात्र, या भागातील जे खऱ्या अर्थाने शेती करतात त्या गोर गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही उपाय योजना करताना दिसत नाही. तालुक्यात पंचायत समितीचा कृषी विभाग व तालुका कृषी विभाग यांच्या मार्फत शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. मात्र, गरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना शेतकऱ्यापर्यंत न पोहचता मधल्या मध्ये गायब होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यानी आम्हाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा कृषिमंत्र्यांनी तालुक्याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी गोर गरीब शेतकरी करत आहेत.
आम्ही शेतकऱ्यांना 400 किलो बियाणे वाटप तसेच 210 भाजी पाल्याचे किट वाटप केले आहे. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. पोलोरायकर, पावर ट्रिलर असे विविध प्रकारचे यंत्र आपण जो पहिला अर्ज करील त्याला देतो.
अर्चना सूळ
तालुका कृषी अधिकारी






