जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उपक्रम
| अलिबाग | प्रतिनिधी |
अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. 1 ते 15 जुलैपर्यंत ही मोहिम असणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय. एस. ओ. मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र, शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी केल्या जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







