| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
तंबाखूच्या सेवेनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तंबाखू मुक्तीसाठी अलिबागमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून तंबाखूमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचा मोठा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर व समाजावर होत आहे. यासाठी तंबाखू नियंत्रणासाठी असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि कोटपा 2003 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या विषयाला अनुसरून मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर, रायगड पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तंबाखू नियंत्रण विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अलिबागमधील पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात सोमवारी (दि.27) ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेस जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. विकास पवार, मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, प्रशिक्षण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब उगले, संजय बच्चा, अनिल गुंजे, आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले. धूम्रपान, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा 2003 (कोटपा 2003) या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. कोटपा 2003 कायद्याचे प्रमुख पाच कलमे आहेत. कलम चार नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंध आहे. कलम सहा ‘ब’ नुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध आहे. कलम सहा ‘अ’ नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरातीवर प्रतिबंध आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमच्या बाबत माहिती सांगताना डॉ. विकास पवार, जिल्हा सल्लागार, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांनी कोटपा कायदा 2003च्या प्रभावी अंमलबाजवणीसाठी सर्व पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी एन्फोर्समेंट स्क्वॉड वाढवावे असे आवाहन केले. दर महिन्याला जिल्हा रुग्णालय, अन्न प्रशासन विभाग, रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने एन्फोर्समेंट स्क्वॉड मार्फत शाळा महाविद्यालय परिसरात कारवाई करण्याचे नियोजन करावे असे सांगितले. या कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. दंडात्मक कारवाईबाबत समुपदेशक हितेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.अनिल गुंजे, डॉ. विकास पवार, युवराज म्हसकर, सुशील साईकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.







