| रायगड | प्रतिनिधी |
दहावी व बारावीची परीक्षा शालेय जीवनात खूप महत्वाची मानली जाते. लाखो नियमित विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. मात्र, काही विद्यार्थी शाळेत जावू न शकल्याने किंवा अन्य कारणास्तव या परीक्षेस खासगी स्वरूपात सामोरे जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वीची परीक्षा खाजगीरित्या देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
खासगी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास एक सवलत आहे. यापुढे फॉर्म क्र. 17 भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, त्यांना घरबसल्या अर्जाची सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष वाचविण्याची ही विशेष संधी असते.
ज्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात नियमित प्रवेश घेणे शक्य झाले नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून बोर्डाने ही सुविधा दिली आहे. विशेषतः जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी जे विद्यार्थी मुदतीत नोंदणी करू शकले नाहीत, त्यांना या विशेष नोंदणी संधीचा लाभ घेता येईल.
अर्ज प्रक्रिया अशी
नोंदणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही टप्प्याचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम मंडळाच्याmahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. Student Corner या विभागात जाऊन आपल्या इयत्तेनुसार (10 वी किंवा 12 वी) Form 17 या लिंकवर क्लिक करावे. अर्जात विचारलेली वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता, माध्यम (मराठी, इंग्रजी, उर्दू इ.) आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाखा (कला, वाणिज्य, विज्ञान) काळजीपूर्वक निवडावी. अर्जासोबत आधार कार्ड, स्वतःचा फोटो आणि शाळा सोडल्याचा मूळ दाखला स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. उपलब्ध शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या यादीतून आपल्या सोयीचे एक केंद्र निवडावे, जिथे तुमचे अर्ज जमा केले जातील.
ऑनलाईन सुविधा यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन असल्याने विद्यार्थ्यांना शुल्कासाठी धावपळ करावी लागत असे. मात्र, आता नोंदणी शुल्क थेट, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल. शुल्क भरल्यानंतर मिळणारी पावती आणि अर्जाची प्रिंट विद्यार्थ्यांनी स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. मंडळाने स्पष्ट केले आहे की, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना जून-जुलै 2026 च्या परीक्षेत बसण्याची परवानगी मिळेल. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संकेतस्थळावर एक सविस्तर मार्गदर्शक पुस्तिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन ऑनलाईन पद्धतीमुळे प्रक्रियेतील त्रुटी कमी होतील आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी एक सोपा मार्ग उपलब्ध झाला आहे, असा विश्वास शिक्षण मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.







