नोंदणीसाठी 31 जुलै अंतिम तारीख; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
| अलिबाग | प्रतिनिधी |
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता खरीप हंगामासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. 31 जूलैपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा उतरविण्याची संधी दिली आहे. ॲग्रीकल्चरल इन्सुरन्स कंपनीमार्फत विमा उतरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यासाठी भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 61 हजार रुपये असून नाचणी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये आहे. त्यासाठी ई-पीक पहाणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी लागणार आहे. या योजनेंतर्गत भातासाठी 1 एकर क्षेत्राकरिता 183 रुपये तर 1 हेक्टर क्षेत्रासाठी 457 रुपये हप्ता असणार आहे. तसेच, डोंगरभागात नाचणीचीदेखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या लागवडीतून शेतकऱ्यांना उभारी मिळावी, म्हणून नाचणीच्या क्षेत्रातही वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नाचणी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 1 एकर क्षेत्रासाठी 35 रुपये व 1 हेक्टर क्षेत्रासाठी 87.50 रुपये हप्ता असणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2025 करीता शेतकरी नोंदणीसाठी दि.31 जुलै अंतिम तारीख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, तालुका प्रतिनिधी राहूल लाडगे व जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम सरनाईक यांनी केले आहे.
ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यात पेरणी न होणे, पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण दिला जाणार आहे.
विमा काढण्यासाठी हे करा
पिक विमा काढण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. सातबारा, आठ ‘अ’चा उतारा असणे आवश्यक आहे. सोबत आधारकार्ड, बँक पासबुक, स्वयंम घोषणा पत्र, किसान क्रेडीट कार्ड व ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. पिक विमा काढण्यासाठी सेवा केंद्र, बँक खाते असलेल्या बँकेत व विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.







