कोलाडच्या रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू
। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्याजवळील चिकणी येथील आदिवासी वाडीतील महिलेने अंबा नदीत उडी घेतली आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) सकाळी 8.30 वाजता घडली आहे. अलका लहू जाधव (35) असे या महिलेचे नाव असून कोलाड येथील सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोठणे बाजूकडून वरवठणे बाजूकडे ही आदिवासी महिला व तिचा पती हे दारूच्या नशेतच नागोठण्यातील जुन्या ऐतिहासिक पुलावरून चालत जात होते. याचवेळी या महिलेने आपल्या हातातील पिशवी खाली ठेवून अंबा नदीत उडी घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अंबा नदीला मंगळवारी पूर येऊन गेला असला तरी बुधवारीही नदी तुडुंब भरून वाहत असल्याने ही महिला पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ सह्याद्री वनजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. या रेस्क्यू टीमचे प्रमुख सागर दहिंबेकर यांच्यासह स्वतः सपोनि सचिन कुलकर्णी तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य प्रयाग बामुगडे, विक्रांत कोंबिले, प्रशांत दोडामनी, भरत मालुसरे, श्वेता विश्वकर्मा, विजया मगर, कृतिका वारंगे, श्रावण भोई, अनुप देशमुख, अजय भोकटे, दामेश तांबट, शरद दिसले, सचिन येवले असे 15 जण मिळून सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास महिलेचा शोध घेण्यासाठी निघाले. मात्र, अंबा नदीच्या पात्रात दूरवर जाऊनही आणि सुमारे दीड तासाच्या शोध मोहिमेनंतरही महिला सापडली नाही. या महिलेचा शोध घेण्यासाठी अजून दोन छोट्या बोटी आणि ड्रोन कॅमेरा मागविण्यात आले असून ही महिला सापडेपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे सचिन कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.







