। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील कंत्राटी वीज कामगार महेंद्र (मयूर) रामचंद्र पाटील (48) यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.16) दुपारच्या सुमारास रानसई येथे घडली आहे. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत गुरुवारी (दि.17) दुपारच्या सुमारास, मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
महेंद्र पाटील हे कंत्राटी वीज कामगार म्हणून कार्यरत होते. बुधवारी ते रानसई येथे विद्युत खांबावर वीज दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्यांना नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती. महेंद्रच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबियांवर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, वडील असा आप्त परिवार आहे.
महेंद्र पाटील हे मागील 30 वर्षापासून कंत्राटी वीज कामगार स्वरूपात महावितरण कंपनीचे काम करत होते. कंत्राटी विज कामगार महेंद्र पाटील हे मयूर वायरमेन या नावाने उरण तालुक्यात सुपरीचित होते. चिरनेर परिसरात रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांचा कॉल येताच महेंद्र पाटील हे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी धाव घेत असत. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, महावितरण कंपनीने त्यांना भरीव स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी चिरनेर येथील नागरिकांकडून केली जात आहे.







