| मुंबई | प्रतिनिधी |
भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.26) दुपारी जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर हा अपघात घडला. लालू कांबळे (59) असे या अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीच्या महाकाली लेणी परिसरात लालू कांबळे रहात होते. शनिवारी दुपारी ते आपल्या दुचाकीवरून लॅपटॉप दुरूस्त करण्यासाठी जात होते. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरून विक्रोळीच्या दिशेने जात असताना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. खड्ड्यांमुळे ते गाडी हळू चालवत होते. मात्र, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कांबळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून जाणारा डंपर चालक साजिद शेख (25) याला गस्तीवरील पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात निष्काळजी, बेदरकारपणे वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







