शेकापच्या वर्धापनदिनी मान्यवरांचे जल्लोषात स्वागत
| पनवेल | प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये शनिवारी शेतकरी कामगार पक्षाचा झंझावात पहावयास मिळाला.

पनवेलकडे जाणारे रस्ते सकाळपासून कार्यकर्त्यांच्या आगमनांनी फुलून गेले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागत फलकांनी संपुर्ण पनवेल शहर शेकापमय झाले होते. खांदा कॉलनी पुल ते नवीन पनवेल येथील माजी आ. दत्तूशेठ पाटील सभागृपर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा कमालीचा उत्साह स्वागत मिरवणूकीत दिसून आला.

हातात लाल बावटा, खांद्यावर लाल मफलर घेऊन लाल बावटे की जय…असा जयघोष करीत हजारो कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजराने पनवेल शहर दुमदुमून गेले होते. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. लाल रंगाचे कपडे परिधान करीत, हातात लाल बावटा घेऊन कार्यकर्ते जमले होते. तो परिसर लालेलाल झाला होता. आला खटारा, आला खटारा या गाण्यांच्या सुराने अनेक कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले होते. बोलता बोलता कार्यक्रमाच्या ठिकाणी अलोट गर्दी झाली. पनवेल नगरीमध्ये राज ठाकरेंसह विविध मान्यवरांचे आमगन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहराच्या मुख्यभागातूान वाजतगाजत शेकापचा जयघोष करीत ही मिरवणूक निघाली. विशेष म्हणजे या मिरवणूकीत महिला कार्यकर्त्यांसह तरुण-तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. त्यांचा उत्साह नजरेत भरणारा होता. पनवेलकरांनी पुष्पवृष्टी करून मान्यवरांचे स्वागत केले. त्या स्वागताने मनसे नेते राज ठाकरेही भारावून गेले. शेतकरी कामगार पक्षाची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ पाहून मान्यवरांनी शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे मनभरून कौतुक केले.
क्रांतीची मशाल प्रज्वलित

कार्यक्रमाच्या प्रारंभी शेकापची विकासाची, क्रांतीची, आंदोलनाची, क्रांतीची मशाल सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय, लाल सलाम लाल सलाम.. जयंत भाईंको लाल सलाम.. भाई जयंत पाटील आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, भाई बाळाराम पाटील आगे बढो.. हम तुम्हारे साथ है आदी गगनचुंबी घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता.
लाल बावट्याला सलाम…

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रक्तरंजित इतिहासाची क्रांती घडवून शासनास जागं करणारा लाल बावटा सर्वांनाच ज्ञात आहे. याच लाल बावट्याच्या क्रांतीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला आहे. असा लाल बावटा शेकापचे सांगोल्याचे आ. बाबासाहेब देशमुखांच्या हस्ते फडकविण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी सलामी दिली. दरम्यान, कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणारे, अंगात नवचेतना निर्माण करणारे ‘रंगाने हा रंगलेला, लाल बावटा लाल.. करीतो आम्ही सलाम त्याला, करीतो आम्ही सलाम’ या शेकाप ध्वजगीताचे गायन करण्यात आले. यावेळी सर्व वातावरण भारावून गेले होते. दरम्यान, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायनसुद्धा कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.







