पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव
| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील खरीप हंगामातील सर्व पिकांची पेरणी लावणी पूर्ण झालेली आहे. भात खाचरे हिरवीगार दिसत आहेत. पिक वाढीसाठी सर्वदूर हवामान अत्यंत पोषक असून, समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, उन्ह पावसाच्या श्रावण महिन्यांपासून भात, नाचणी आदी खरीप पिके तसेच भाजीपाल्यावर येणाऱ्या किडी व रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे.
खरीप हंगामामध्ये वातावरणातील बदलांमुळे पिकांवर विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. सद्यस्थितीमध्ये पाऊसमान चांगले असून, भात पीक वाढीच्या कालावधीत भात शेतात पाण्याचे नियोजन करणे पीक वाढीच्या व कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाब आहे. भात लावणीनंतर सुरुवातीच्या 1 महिना कालावधीमध्ये 2 ते 3 से. मी. उंची इतके पाणी शेतामध्ये बांधून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 1 महिन्यानंतर म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये भात पिकाचे दाणे तयार होईपर्यंत 5 से. मी. उंची इतके पाणी बांधून ठेवणे गरजेचे आहे. जमीन पाणथळ होते तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. यामुळे भात पिकावर निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुडे या किडींचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि पिकाचे नुकसान होते.
निळे भुंगेरे भात पिकावर पडणारी एक घातक कीड आहे. या किडीची अळी आणि प्रौढभुंगे या दोन्हीही अवस्था भात पिकासाठी नुकसान कारक आहेत. कीडीचे भुंगेरे गर्द निळया रंगाचे असतात तर अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते. कीड पानाचा हिरवा भाग खरडवून खाते. त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसून येतात रासायनिक पध्दतीने किड नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी 500 लिटर पाण्यातून क्विनॉलफॉस 25 टक्के 2 लिटर किंवा लॅमडासायहॅलोथ्रिन 5 टक्के 250 मि.ली. या पैकी एका किटकनाशकाची फवारणी घ्यावी.सुरळीतील अळी या किडीचे फुलपाखरु लहान, नाजूक दुधाळ पांढऱ्या रंगाचे असते. पंखावर फिकट काळे लहान लहान ठिपके असतात. अळी पारदर्शक फिकट हिरवट पांढरट असते. त्यामुळे भाताच्या पानांवर पांढरे पटटे दिसून येतात, शेत निस्तेज दिसते, पिकाची वाढ खुंटते. आवश्यकता वाटल्यास फेनथोएट 50टक्के प्रवाही किटकनाशक 1 ली. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
तपकिरी तुडतुडे ही आपल्या परिसरामध्ये भात वाढीच्या मध्यावधी कालावधीमध्ये मोठया प्रमाणात आढळून येते. भातशेतीमध्ये मध्यभागी तुडतुडयांच्या प्रादुर्भावामुळे करपून गेलेले गोलाकार भाताचे पिक दिसते, यालाच हॉपर बर्न असे म्हणतात. किडीच्या नियंत्रणासाठी भात लागवड दाट करु नये यासाठी 20 गुणिले 15 सेमी. अंतरावर लागवड करणे, पट्टा पध्दतीची लागवड सोईची ठरते. शेतातील पाण्याचा निचरा करणे अत्यंत आवश्यक आहे. ऍसिफेट 75 टक्के 1040 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के, 100 मि.ली. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टर फवारणी करणे आवश्यक आहे.
कोकण परिसरात भात पिकावर करपा, कडाकरपा, शेंडे करपा, पर्णकोष करपा, आभासमय काजळी, उदबत्ता सारखे रोग प्रामुख्याने आढळतात. त्याचेही नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी भात शेतीची स्वच्छता खुप महत्वाची आहे. पिक कापणीनंतर शेतातील धस्कटे काढून नष्ट करावे. बांधावरील तणांचा नाश करावा. रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. पेरणीपूर्व भात बियाण्यास बिज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. पिकास संतुलित खतांचा वापर करावा. करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डॅझिम 0.1, मॅन्कोझेब 0.25टक्के किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.25टक्के 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन पोलादपूर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी केले आहे.





