कोळी बांधवांची किनाऱ्यावर लगबग सुरू
| आगरदांडा | प्रतिनिधी |
दोन महिन्यांच्या बंदीनंतर शुक्रवार 1 ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्य व्यवसायात मासेमारी हंगामाला पुन्हा सुरुवात झाली असली तरी काही कोळी मच्छिमार बांधव नारळी पौर्णिमेपासूनच मासेमारी हंगामाला सुरुवात करणार आहेत. सध्या त्यांची लगबग समुद्रकिनारावरील पकटीवर सुरू झाली आहे. नव्या मासेमारी हंगामाकरिता मच्छिमार सज्ज झाला आहे.
रायगड जिल्ह्यात 2130 सहा सिलिंडरच्या बोटी असून, एका बोटीवर 12 खलाशी व नाखवा काम करत असतो, असे एकूण 27 हजार 690 कामगारांचा या व्यवसायावर उदरनिर्वाह चालत असतो. वर्षभरात करोडोंच्या आसपास उलाढाल होत असते, अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती उपाध्यक्ष व रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मुरुड सागर कन्या मच्छिमार सहकारी सोसायटी चेअरमन मनोहर बैले यांनी दिली.
सागरी क्षेत्रात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे मत्स्य उत्पादन वाढीसाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात मासेमारीसाठी नौकांवर बंदी घालण्यात येते. सरकारने घातलेली मासेमारी बंदी 31 जुलैला संपली असून, 1 ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. मासेमारी बंदी 1 ऑगस्ट रोजी उठली असली तरी अद्याप होड्या बंदारावरच आहेत. आजही समुद्रकिनारी कोळी बांधव आपल्या बोटीवरील प्लास्टिक कपडा व बोटीवर रात्रीच्या वेळी चांगला उजेड मिळावा याकरिता सोलर पॅनेल बसविणे, मोठ्या जाळी, बर्फ, पिण्यासाठी पाण्याची टाकी, त्याबरोबर रॉकेल, डिझेल, महिनाभर पुरेल एवढे धान्य, खाद्यपदार्थ व विविध वस्तू बोटीवर भरण्यास सुरुवात केली आहे. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊनच मच्छिमार मासेमारीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. मासेमारी मोठ्या प्रमाणात होऊन दे, झालेले कर्ज फिटू दे, धंद्यात चांगला फायदा होऊन दे, हीच प्रार्थना समस्त कोळी बांधव सागराकडे करीत असतात.
सर्वसाधारणपणे नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करुन मासेमारी बोटी समुद्रात उतरुन मासेमारीचा हंगाम सुरू होतो. यंदा हवामान चांगले असल्याने या हंगामाला लवकरच सुरू होताना दिसत आहे. अनेकांनी नौकांची डागडुजी, रंगरोगोटी केली आहे. तर, काहींनी आता सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपासून बसून असलेले मुरुड, एकदराचे कोळी मच्छिमार बांधव पुन्हा नव्या उत्साहात खोल दर्यावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मनोहर बैले,
चेअरमन,
सागर कन्या मच्छिमार सहकारी सोसायटी






