पालिकेच्या कारभारावर शेकापची टीका
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
ज्या मार्गांवर सार्वजनिक परिवहन विभागाकडून प्रवाशांसाठी कोणतीही बस सेवा पुरवली जात नाही, अशा मार्गांवर पालिकेच्या माध्यमातून बस थांबा बांधण्यात आल्याने प्रशासनाच्या या अजब कारभारा विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
पनवेल पालिकेच्यावतीने पालिका हद्दीतील प्रवाशांसाठी सध्या कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अशा वेळी पालिकेच्या वतीने बस सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालिकेच्यावतीने तसे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. असे असताना बस सेवा सुरु करण्यापूर्वीच पालिका हद्दीतील अनेक शहरी भागात अत्याधुनिक पद्धतीचे बस थांबे बांधण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे पालिका हद्दीतील काही मार्गांवर धावत असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या एनएमएमटीची बस थांबत असलेल्या ठिकाणी थांबे बांधणे आवश्यक असताना अशी ठिकाणे न निवडता ज्या रस्त्यावरून बसच धावत नाही अश्या रस्त्यावर थांबे उभारून प्रशासन नागरिकांची थट्टा करत असल्याचा आरोप शितोळे यांनी केला असून, ज्या ठिकाणी गरज आहे अशाच ठिकाणी थांबे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी शितोळे यांनी केली आहे. कामोठे वसाहतीतील सेक्टर 22 येथील अंतर्गत रस्त्यावर पालिकेच्यावतीने थांबा तयार करण्यात आला आहे. मात्र, या मार्गांवर कोणतीही बस सेवा उपलब्ध नसल्याकडे देखील शितोळे यांनी लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
शहरी भागात गरज नसतानाही थांबे उभारले जात असल्याचा आरोप होत असताना पालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या थांब्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नसल्याचे पाहायला मिळते. मुंब्रा- पनवेल महामार्गवरील धानसर या गावाला बस थांब्याची गरज आहे. गावाचा दुरावस्था झालेला थांबा तयार करून द्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे. असे असताना गरज नाही त्या ठिकाणी थांबा बांधून देणारे प्रशासन गावकरी करत असलेल्या मागणी कडे मात्र दुर्लक्ष करत असून, दुसऱ्या टप्प्यात काही महिन्या नंतर ग्रामीण भागात थांबे बांधणार असल्याची माहिती प्रशासन देत आहे.
बॅनर लावून ओढले ताशेरे
पालिके कडून बांधण्यात आलेल्या बस थांब्यावर बॅनर लावून शेकाप तर्फे पालिकेच्या कामकाजावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत.







