रिलायन्स व एल अँड टी कंपनीच्या नियोजनशून्य कामाचा फटका
| नागोठणे | महेश पवार |
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पातील अधिकाऱ्यांसाठी कंपनीच्या जुन्या निवासी संकुलासमोरच महाकाय कॉलनी बांधण्यात आली आहे. मात्र, ही कॉलनी बांधण्यासाठी नावाजलेल्या एल ॲन्ड टी कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट देणाऱ्या रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कॉलनी बांधणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका सध्या कॉलनीत राहणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कुटुंबांना बसला आहे. सोमवारी (दि.18) पडलेल्या पावसामुळे या कॉलनीच्या आवारात तीन ते चार फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे कॉलनीत पार्किंग केलेली वाहने बुडाली तर तळ मजल्यावर राहणाऱ्या अधिकारी वर्गाच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाल्याने त्यांना इतरत्र हलवावे लागले. शिवाय त्यांच्या सामानाचेही नुकसान झाले आहे. करोडो रुपये खर्चून बांधलेल्या प्रशस्त व दिमाखदार दिसणाऱ्या या कॉलनीची अवस्था पाहून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (एनएमडी) प्रकल्पातील अधिकाऱ्यांसाठी नवीन वसाहत बांधतांना शेकडो एकर जागेवर करण्यात आलेला प्रचंड भराव, कॉलनीच्या मागील बाजूस पश्चिमेकडे मोठे डोंगर असल्याने या डोंगरातून पावसाळ्यात पाण्याचा मोठा लोंढा येणार असल्याचे माहित असूनही या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाचा निचरा होण्यासाठी नियोजन न करणे, कॉलनीच्या जागेवर असलेल्या जंगलातील व ऑक्सिजन देणाऱ्या शेकडो झाडांची कॉलनी उभारताना केलेली कत्तल, आपला हक्काचा निवारा नाहीसा झाल्याने मोठ्या प्रमाणात विषारी साप बाहेर पडल्याने त्यांचा वाढलेला धोका, रिलायन्सच्या इतरत्र असलेल्या संपादित जागेवर कॉलनी न बांधता केवळ ही झाडाझुडपंनी व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी मोठमोठ्या वृक्षांनी भरलेली शेकडो एकर महत्वाची जागा विनाकारण सिमेंटच्या जंगलाने भरण्यात आली.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (एनएमडी) प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी कंपनीच्या जुन्या निवासी संकुलातील मोठ्या प्रमाणातील जागेतील काही इमारती पाडून त्या जागेवर रिलायन्सचा प्रकल्प विस्तारित करण्याचे कंपनी व्यवस्थापनचे प्रयोजन आहे. त्यामध्ये राहणाऱ्या रिलायन्सच्या अधिकारी वर्गासाठी नव्याने कॉलनी बांधण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी जुन्या निवासी संकुलासमोर पश्चिम दिशेला असलेल्या आणि जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रचलित असलेल्या करकरणी मातेच्या डोंगराखालील बाजूस असलेली कंपनीच्या मालकीची शेकडो एकर जागा निवडण्यात आली.
याच जागेवर कॉलनी बांधण्याचे काम रिलायन्सने प्रसिद्ध अशा एल अँन्ड टी या मोठ्या कंपनीला दिले. डोंगराखालील जंगल व मोठमोठ्या वृक्षांचा परिसर असलेल्या या शेकडो एकर जागेवर एसी केबिनमध्ये बसून निसर्गाच्या विरोधात जाऊन कॉलनी बांधण्याचा आराखडा रिलायन्सच्या नावाजलेल्या व गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अभियंत्यांनी तयार केला. मात्र नियोजित कॉलनीच्या जागेची भौगोलिक परिस्थित माहिती नसल्याने आणि स्थानिक नागरिकांकडून त्याविषयी जाणून घेण्याचे कष्टही रिलायन्स व एल. अँड. टी.च्या अभियंत्यांनी न घेतल्याने कॉलनीच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने कॉलनी परिसरात 3 ते 4 फूट पाणी तुंबल्याची परिस्थित निर्माण झाली. महाकाय डोंगराच्या पायथ्याशी ही कॉलनी बांधण्यात आल्याने यामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना भविष्यातही धोका असल्याने जिल्हा आपत्कालीन यंत्रणेने याबाबतीत योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. यासंदर्भात रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.







