| वावोशी | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याच्या औचित्याने रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी 18 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील आदिवासीबहुल ताडवाडी व चाफेवाडी ग्रामसभांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांचा शुभारंभ करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी तहसील कार्यालय, कर्जत मार्फत नवीन शिधापत्रिका, डीबीटी, अंत्योदय व संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, जिवंत 7/12 अंतर्गत नवीन उतारे व विविध दाखले ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. ग्रामविकास विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. वनविभागाने बांबूची रोपे तर कृषी विभागाने हापूस आंब्याची कलमे वाटली. दरम्यान, ग्रामस्थांनी वाहतुकीच्या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधले. गावात दिवसातून केवळ एकच बस येते, अशी व्यथा समोर मांडल्यावर जिल्हाधिकारी जावळे यांनी थेट उपवाहतूक नियंत्रकांशी संपर्क साधून सोमवारपासून नियमित बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी साहेब हे चाफेवाडीत ग्रामस्थांसोबत जमिनीवर बसून थेट संवाद साधत होते. त्यामुळे गावात आपलेपणाचा माहोल पसरलेला पाहायला मिळाला. यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्यासमवेत कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे, सह प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव आदी उपस्थित होते.







