आमदार लक्ष द्या, रस्ता वनविभागाच्या कात्रीत
| रोहा | प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. शेकडो भाविक देवीदेवतांच्या दर्शनाला येत असतात. त्यातील चणेरा विभागातील कोकबणच्या श्री धावीर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता अक्षरशः चिखलात रूतला आहे. कोकबण मुख्य रस्त्यापासून केवळ अडीच ते तीन किलोमीटर असलेला हा रस्ता अत्यंत निमुळता व चिखल-खड्ड्यांनी धोकादायक बनला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू असून शेकडो भाविक देवीदेवता मुख्यतः आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या दर्शनाला येत असतात. त्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेला चणेरा विभागातील कोकबणच्या श्री धावीर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता अक्षरशः चिखलात रूतला आहे. कोकबण मुख्य रस्त्यापासून केवळ अडीच ते तीन किलोमीटर असलेला हा रस्ता अत्यंत निमुळता व चिखल-खड्ड्यांनी धोकादायक बनला आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात श्री धावीर महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. दरम्यान, हा कच्चा रस्ता ग्रामस्थांनी श्रमदानातून बनवला होता. परंतु, सततच्या पडणाऱ्या पासामुळे तो रस्ता वाहून गेला. अशातच कोणीच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही असा, आक्षेप मंदिरातील उपस्थित काही स्थानिक तरुणांनी घेतला आहे. तसेच, आ. महेंद्र दळवी यांनी जाणीवेतून रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. तर संरक्षित फणसाड अभयारण्य नियम अटी शर्थीत हा रस्ता वनविभागाच्या कात्रीत अडकला आहे. त्यामुळे आजपर्यंत पक्का रस्ता करता आलेला नाही. उर्वरीत रस्ता लवकरच मार्गी लावू, पक्का रस्त्याच्या परवानगीसाठी आमचा लढा सुरू आहे. अन्यथा केव्हाच रस्ता केला असता, अशी प्रतिक्रिया ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी दिली आहे.







