| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर पंचायत समिती प्रभागाचे आरक्षण खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात सोडत पद्धतीने खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दोन शाळकरी मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे जाहीर केले.
खालापूर पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण खुले असल्याने अनेकांना सभापती पदाची स्वप्ने पडली होती, मात्र इच्छुक दावेदार, आर्थिक प्रस्थ आणि प्रस्थापित यांच्या स्वप्नांना तिलांजली मिळाली, त्यांच्या प्रभागात राखीव आरक्षण पडल्याने त्यांची सभापती पदाची स्वप्ने पूर्णपणे कोलमडून पडली आहेत. खालापूर पंचायत समितीमध्ये आठ गण आहेत. चौक गण आदिवासी महिलासाठी राखीव झाला असून, हाळ खुर्द आदिवासी राखीव पडला. वासांबे मोहोपाडा व वाशिवली हे नागरिकांचा मागास प्रवर्ग झाले असून, वाशिवली गणात स्त्री आरक्षण जाहीर झाले आहे. तर रीस, सावरोली, खानाव आणि आत्कारगाव हे सर्वसाधारण प्रभाग नक्की होऊन सावरोली आणि आत्करगाव सर्वसाधारण महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. खालापूर तालुक्यातील अनेकांनी काही दिवसांपूर्वी सभापती पदाची तयारीदेखील केली होती, अनेकजण दानशूर झाले होते. गाठीभेटी सुरू झाल्या होत्या, रुसवे फुगवे दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, तरीही रीस आणि खानाव हे मातब्बर आणि यापूर्वी राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते या ठिकाणी आहेत, त्यामुळे चुरस ही नक्की पाहावयास मिळणार आहे.







