| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण म्हणून जाहीर झाल्यानंतर बोर्ली, राजपुरी, कोर्लई, नांदगाव या चार गणांच्या जागेची आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मुरुड पंचायत समिती महाराष्ट्र भूषण डॉ.ति.श्री. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात तहसीलदार-उपविभागीय अधिकारी मुरूड दुर्गा देवरे व आदेश डफल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
तहसीलदार आदेश डफल यांनी प्रथम तालुक्यातील आलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे स्वागत करुन आरक्षणला सुरुवात करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेश व निर्देशानुसार 76 राजपुरी गण अनु. जमाती महिला राखीव ठेवण्यात आली. नांदगाव, बोर्ली, कोर्लई गणांसाठी चिठ्ठ्या बनवून प्लास्टिकच्या बरणीत सर्वांच्या देखत टाकण्यात आल्या. त्यामधील शिक्षण मंडळ नगरपरिषद 4 मधील विद्यार्थी हुजेफा शेख या 9 वर्षांच्या मुलीने एक चिठ्ठी उचलली. त्या चिठ्ठीमध्ये कोर्लई गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. उरलेल्या दोन चिठ्ठ्या सर्वसाधारण, नांदगाव व बोर्ली सर्वसाधारण खुला आरक्षण आले.
आरक्षण सोडतेवेळी उपविभागीय अधिकारी मुरूड दुर्गा देवरे, मुरुड तहसीलदार आदेश डफल, निवासी नायब तहसीलदार संजय तवर, नायब तहसीलदार राजेश्री साळवी, निवडणूक नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर, गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, महसूल सहायक प्रतिक पावसकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश पाटील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मनोज कमाने, ऋषिकांत डोंगरीकर, नौशाद शाबान, संदीप गोणबरे, शैलेश काते, विजय गिदी, मंदा ठाकूर, आदेश भोईर, शाम कोतवाल, बाबू नागावकर, चंद्रकांत कमाने, चरण पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.






