तीन जागा अनुसूचित जमातीसाठी; सहापैकी चार जागांवर महिला
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या कर्जत तालुक्यात असलेल्या सहा जागांसाठी आज आरक्षण सोडत निघाली. या आरक्षण सोडतीत तीन जागा अनुसूचित जमातीसाठी तर दोन जागा सर्वसाधारण आणि एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. दरम्यान, या आरक्षण सोडतीने कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना जमिनीवर आणले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक आगामी काळात होणार आहे. त्यासाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट आहेत. त्यातील तीन गट हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्या असून, त्यातील कशेळे आणि बीड बुद्रुक हे दोन जिल्हा परिषद महिला राखीव झाले आहेत. कडाव हा जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव झाला असून, अन्य दोन जागा सर्वसाधारण राखीव आहे. नेरळ आणि माणगाव तर्फे वरेडी हे दोन्ही गट सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत. 2018 च्या निवडणुकीत कर्जत तालुक्यात दोन गट अनुसूचित जमाती राखीव होते, तर दोन गट नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आणि दोन सर्वसाधारण गट होते. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत सहापैकी चार गट हे महिला राखीव बनले असून, सहापैकी तीन गट अनुसूचित जमाती राखीव झाल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी करीत असलेल्या सर्व सहा प्रभागातील इच्छुक यांच्या आशा अपेक्षा यांच्यावर पाणी फेरले गेले आहे.
कशेळे या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी करणारे शिवसेना पक्षाचे प्रसाद थोरवे, भास्कर देसले यांची कोंडी आरक्षणाने केली आहे. युवा उद्योजक ऋषिकेश राणे यांना देखील संधी मिळणार नाही. तर अनुसूचित जमाती आरक्षण होऊन देखील जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे आणि आदिवासी संघटनेचे माजी अध्यक्ष भरत शीद यांनादेखील महिला आरक्षण असल्याने संधी मिळणार नाही. आदिवासीबहुल कळंब जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती राखीव झाल्याने तेथे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भगत, शेकापचे अनिल जोशी, श्रीराम राणे, शिवसेनेचे राहुल विषे यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. तर कडाव जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका संघटक बाबू घारे यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शिवसेना पक्ष कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेरळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढण्याचे गणित मांडणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. नेरळ जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने महिला कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. माणगाव तर्फे वरेडी गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे माजी सभापती अमर मिसाळ, प्रदीप ठाकरे, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले तसेच युवा कार्यकर्ते सागर शेळके, रत्नाकर बडेकर यांची जिल्हा परिषदेत जाण्याची स्वप्नदेखील स्वप्न राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचा प्रभागदेखील असलेले मोठे वेणगाव हा गटअनुसूचित जमाती महिला राखीव झाल्याने खांडपे ग्रामपंचायत माजी सरपंच असलेल्या सुधाकर घारे यांच्या पत्नी तसेच शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर, युवा सेनेचे संदीप भोईर, माजी सरपंच आरती भोईर, मधुकर घारे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर यांचे सुपुत्र यांची स्वप्नदेखील हवेत विरली आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांसाठी ही आरक्षण सोडत राजकीय पक्षांना आणि त्यांच्या इच्छुकांना जमिनीवर आणणारी ठरली आहे.
जिल्हा परिषद गटांचे आरक्षण ..
कळंब- अनुसूचित जमाती, कशेळे- अनुसूचित जमाती महिला, कडाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, नेरळ- सर्वसाधारण महिला, माणगाव तर्फे वरेडी- सर्वसाधारण महिला, मोठे वेणगाव- अनुसूचित जमाती महिला.






