कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन द्या; जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
| रसायनी | प्रतिनिधी |
रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधीवली येथील स्कूल कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. याबाबतच्या तक्रारीनंतर रीतसर चौकशी होऊन एमइपीएस कायदा 1977 /1981 या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन व इतर सवलती देऊन कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारुद्र नाले यांनी रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवलीच्या प्रशासनाला दिले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जे.एच. अंबानी स्कूल लोधिवली या शाळेचे बदललेले नाव रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधिवली, ता. खालापूर, जि. रायगड आहे. या संस्थेत काम करणाऱ्या कामगारांना संस्था एमइपीएस कायदा 1977/1981 या कायद्यानुसार वेतन व इतर सवलती मिळत नसल्यामुळे दि. 3 मार्च 2025 व 26 जून 2025 रोजी एमइपीएस कायदा 1977/1981 या कायद्यानुसार अमोल सांगळे यांनी लेखी तक्रार दिली होती. वेतन न देता ही खासगी संस्था कर्मचारी यांना सोयी-सुविधा आणि हक्काच्या वेतनापासून दूर ठेवून कर्मचारी यांची पिळवणूक करीत होते. याविरोधात शासनाने संस्थेला दिलेली मान्यता रद्द करून कायदेशीर संस्थेवर सक्त कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केलेली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने दि.28 जुलै 2025 रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक महारुद्र नाले यांनी दोन्ही बाजूची सुनावणी घेतली होती. यावेळी तक्रारदार यांच्या वतीने ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी कायदेशीर बाजू मांडली तसेच तक्रारदार यांनी लेखी म्हणणे सादर केले. प्रशासनाने त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी संस्थेतील कामगारांना कायद्यानुसार वेतन व इतर सवलती न देता चुकीच्या पद्धतीने मनमर्जी कारभार केला आहे. कंपनीचे अधिकारी यांना गरीब कामगारांच्या बाबतीत वरिष्ठ यांच्याकडे चुकीचा संदेश देऊन अन्याय केला.रिलायन्स फाऊंडेशन स्कूल लोधीवली यांच्याविरोधात याच अनुषंगाने उच्च न्यायालयात तक्रार दाखल आहे. तसेच या कायद्यानुसार वेतन न देता खासगी संस्था लबाडी, फसवणूक करत असल्याबाबत शासनाने संस्थेला दिलेली मान्यता रद्द करावी, असा अर्ज दाखल केला आहे. शिक्षण अधिकारी महारुद्र नाले यांनी कायदेशीर बाबी तपासून हा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्याने रिलायन्स फाऊंडेशन स्कूल, लोधिवली व अन्य संस्था यांच्यात खलीबली माजली आहे. या आदेशाने वर्षानुवर्षे कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचारी यांचे भविष्य घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







