| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
कोकण वासीयांना ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे रोजगारासाठी शहरात जावे लागते. कोकणवासीय गणेशोत्सव, शिमगा, दिवाळी या सणासुदीला मोठ्या प्रमाणावर गावी येत असतात. त्यावेळी हा प्रवास ते कोकण रेल्वेच्या माध्यमातून करत असतात. कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि कमी खर्चिक आहे; मात्र, कोकण रेल्वेच्या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या फलाटांची उंची अतिशय कमी असल्यामुळे जीव मुठीत घेऊन चाकरमान्यांसह लहानमुलं, महिला, वयोवृद्ध व दिव्यांगांना उतरावे लागते. गेल्या 30 वर्षांपासून यामार्गावरील प्रवासी आपली व्यथा शासनदरबारी, तसेच रेल्वे बोर्डाकडे करीत आहेत. मात्र, त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या संदर्भात कोकण विकास समितीच्यावतीने 20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील रेल्वे बोर्डाचे मुख कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.







