| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील पेशवे आळी ते बाजारपेठ असा जोडणारा पूर्वी कोपरी मार्ग होता. या मार्गावरून पावसाळी पाणी वाहते. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गाला नाल्याचे स्वरूप येते. चार ते पाच वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेने या नाल्यावर पूर्णपणे काँक्रीटचा रस्ता तयार केला. हा मार्ग तयार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जागामालकांना रान मोकळे मळािले आहे. अनेकांनी या काँक्रीट मार्गाच्या बाजूला आपली अनधिकृत बांधकामे उभी करून गाळे बांधून ते भाड्याने दिले आहेत. परंतु, त्यासाठी जागा मालकांनी आपल्या जागेतील विविध जातींचे वृक्ष, नारळ, सुपारीची रोपे एका रात्रीत कत्तल करून त्या ठिकाणी सपाट मैदान तयार केले आहे. दिवाळीनिमित्त लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन हे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसानंतर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती इमारती उभ्या राहतील. त्यामुळे निसर्गरम्य असलेले श्रीवर्धन शहर कॉंक्रीटच्या जंगलात हरवून जाईल, असे पर्यावरण प्रेमींकडून बोलले जात आहे. तरी श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने संबंधित जागा मालकांवर झाडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच, त्या ठिकाणी एखादा विकासक इमारती उभ्या करण्यासाठी परवानगी मागत असल्यास ती देऊ नये, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.





