| चिपळूण | प्रतिनिधी |
कोकण रेल्वेचे चिपळूणमधील स्टेशन जरी वालोपे येथे असले तरी बहुसंख्य प्रवाशी चिपळूणच्या बाजूचे असल्यामुळे मुंबईला जाणारे किंवा चिपळूणला येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी चिपळूण बाजूने असते. यापैकी काही प्रवासी गांधारेश्वर पुलामार्फत चिपळूणकडे जातात तर काही पेठमाप, साईनाका मार्गाने प्रवास करतात. मात्र, या रस्त्यावर मोठी झाडीझुडपे वाढल्यामुळे प्रवास करणे अडचणीचे वाटू लागले आहे.
रेल्वेस्टेशनच्या चिपळूणकडील दिशेतील उजव्या बाजूने पेठमापकडे जाणारा रस्ता फार अरुंद आहे. या मार्गाने शहराकडे जाणाऱ्या प्रवाशाबरोबरच मिरजोळी, कोंढे, शिरळ या ग्रामीण भागातील लोकदेखील याच मार्गाने जातात. आता या रस्त्याच्या कडेला इतकी झुडपे वाढली आहेत कि ती रस्त्यावर आलीआहेत. यामुळे दुचाकी, रिक्षा व चारचाकी गाड्या समोरासमोर आल्या कि पासिंग करताना अडचण येते तर दुचाकीसाठी हे धोकादायक आहे. शिवाय याच मार्गावर दोन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, त्यामुळे समोरून येणारे वाहन नजरेस पडत नाही.
कोकण रेल्वेमार्गावरील चिपळूण हे महत्वाचे रेल्वेस्टेशन आहे. तसेच लवकरच हे स्टेशन जंक्शन होणार आहे. अशावेळी अशा गजबजलेल्या, गर्दीचे ठिकाण असलेल्या स्टेशन रेल्वेकडील रस्ता अरुंद का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लोकांच्या मागणीचा विचार करुन सदर रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करावे, यासाठी जोरदार मागणी होत आहे. तसेच रस्त्यावर आलेली झाडीझुडपे लवकर हटवावीत.







