| वेंगुर्ला | प्रतिनिधी |
तालुक्यात गुरूवारी (दि.23) दुपारनंतर विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी भाताची पेंडके भिजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी, नुकत्याच सुरू झालेल्या भातकापणीच्या कामात खंड पडला आहे. पिकलेल्या भातशेतीला फटका बसला आहे. जोरदार पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचले, परिणामी भातशेतीसाठी तयार केलेल्या भाताच्या उडव्या आणि खळे पाण्याने भरून गेले. भाताची पेंडके भिजल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तर भातशेती पूर्णपणे करपून गेली आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून गरीब शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.







