1 नोव्हेंबरला नेरळ ते माथेरानदरम्यान धावणार
| नेरळ | प्रतिनिधी |
दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारी नेरळ- माथेरान मिनीट्रेन यावर्षी उशिरा धावणार आहे. पूर्वी दसऱ्यानंतर 15 ऑक्टोबरला ट्रेनचा मुहूर्त ठरवला गेला होता. मात्र, सततच्या अनियमित पावसामुळे हा मुहूर्तही हुकला. परिणामी, यंदा तब्बल एक महिना उशीर झाला असून ट्रेन अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू असून, 1 नोव्हेंबरला म्हणजेच पहिल्या आठवड्यात मिनीट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरान दिशेला धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांना दिली आहे.
पर्यटकांच्या आवडत्या मिनीट्रेन मार्गातील माथेरान परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली असून, कड्यावरचा गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. याठिकाणी रेल्वे ट्रॅकखालील भाग कमकुवत झाल्याने सुरक्षा भिंत उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे कामाचा वेग मंदावला असून, रेल्वे विभागाने या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गती दिली आहे. नेरळ स्थानकाचे स्टेशन मास्तर गुरुनाथ पाटील यांनी अलीकडेच माथेरान मार्गावरील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले असले तरी, “मिनी ट्रेन लवकर सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही महत्त्वाची कामे मार्गी लागल्यानंतर मालवाहू ट्रेनची ट्रायल घेतली जाईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
अमन लॉजमाथेरान शटल सेवा पर्यटकांच्या सेवेत
दरम्यान, अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सध्या सुरू असून, पर्यटकांना तिचा आनंद घेता येतो आहे. मुसळधार पावसातही ही सेवा अखंडित सुरू राहिली आहे. त्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
1907 पासूनची ऐतिहासिक परंपरा
माथेरान मिनी ट्रेन ही 1907 साली ब्रिटिश काळात सर आदमजी पिरभाय यांनी सुरू केली होती. दरवर्षी 15 जून रोजी पावसाळ्यामुळे ट्रेन बंद केली जाई आणि दसऱ्याच्या सुमारास पुन्हा सुरू केली जात असे. या ट्रेनमुळे माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना मिळते. परंतु, यंदा अनियमित हवामानामुळे शिरस्ता मोडीत निघाल्याने पर्यटक आणि व्यापारी दोघेही नाराज आहेत. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस सहा महिने झाले ऑक्टोबर संपायला आला तरी माथेरानमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.
थंड हवा आणि मुसळधार पावसाचा दुहेरी अनुभव
सध्या माथेरानचा हिवाळी हंगाम सुरू झालेला आहे. या हंगामात पर्यटकांना एकाच वेळी दोन अनुभव घेता येतात. एकीकडे मुसळधार पावसाचा, तर दुसरीकडे थंडगार हवेचा. काही पर्यटक या दुहेरी वातावरणाचा आनंद घेत आहेत, तर काहींना पावसामुळे झालेल्या अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही माथेरानच्या निसर्गसौंदर्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पावसाळ्यात दगड, गोटे आणि माती घसरण्याची शक्यता लक्षात घेऊन “कोणीही घाटातून रेल्वेमार्गावर जाऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल,” असा इशारा देणारा फलक वॉटर पाईप स्थानकाजवळ लावण्यात आला होता. मात्र हा फलक नेमका कोणी लावला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
रेल्वे विभागाच्या सुरू असलेल्या दुरुस्ती व सुरक्षाविषयक कामांमुळे ट्रेन सुरू होण्यास विलंब झाला असला तरी, ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळमाथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा पर्यटकांच्या दिमतीला धावेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिनीट्रेन 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, आता साधारण 1 नोव्हेंबरला पहिली नेरळपासून माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. स्वप्नील नीला,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे





