| तळा | प्रतिनिधी |
परतीच्या पावसामुळे यावर्षी भातशेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघाडी दिली असल्याने तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून, तालुक्यातील नागरिक भात कापणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे बाजारपेठ परिसरात शुकशुकाट पसरला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे यावर्षी बहुतांश ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे. लहरी पावसाचा भरोसा नसल्यामुळे तळा तालुक्यात शेतकरी वर्गाची भात कापणीची लगबग सुरू झाली असून, तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात मग्न झाला आहे. मात्र, यावर्षी मजुरीत वाढ झाली असल्याने वाढलेल्या मजुरीचा फटका बळीराजाला बसला आहे. वाढती महागाई, खते व बी बियाणांचे वाढलेले दर यामुळे सध्याच्या काळात शेती करणे परवडणारे नाही. मात्र, अशा परिस्थितीत देखील तालुक्यातील बहुतांश शेतकरी परवडत नसली तरी शेती करतात. परतीच्या पावसामुळे भात शेतीचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी दिवसा कडक उन्हातही जस जमेल तसे शेतातील भात कापणी केली जात आहे. भात कापणीला मजुरांची देखील कमतरता जाणवत असून, पावसामुळे भात भिजण्याची शक्यता असल्याने मिळेल ती मजुरी देऊन लवकरात लवकर भात कापणी केली जात आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात गुंतला असल्याने बाजारपेठ परिसरात देखील शुकशुकाट पसरला आहे.







