| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील उदयोन्मुख कुस्तीगीर लावण्या देशमुख हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरही यशाची नवी गाथा रचली आहे. पानिपत-हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
लावण्या देशमुख हिने आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पदकांची कमाई केली असून, 2018 मध्ये राज्यस्तरीय कांस्य, 2022 मध्ये राज्य अजिंक्यपद रौप्य, 2023 मध्ये ताराराणी केसरी रौप्य आणि कोकण केसरी सुवर्ण, 2024 मध्ये मावळ केसरी सुवर्ण आणि राज्यस्तरीय रौप्य, तर 2025 मध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदक मळिवत तिच्या यशाची मालिका सुरूच ठेवली आहे. आता राष्ट्रीय स्तरावरही पदक पटकावत लावण्याने आपल्या कुस्ती कारकिर्दीला नवे वळण दिले आहे. तिच्या या यशाबद्दल खालापूर तालुक्यातील विधितज्ञ मीनाताई बाम, नागरी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा वर्षा मोरे व दिनकर भुजबळ आदी मान्यवर मंडळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.







