महामार्गावरील खड्डे भरण्यास प्रारंभ
| कोलाड | प्रतिनिधी |
मागील सतरा ते अठरा वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्गावर 66 वरील सतत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर एवढेच नव्हे तर, त्यात आता वाहने अडकून बंद पडत आहेत. याबाबत कृषीवलने आवाज उठवताच संबंधित विभागाला जाग आली असून, महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांसह प्रवाशांनी कृषीवलचे आभार मानले आहेत.
खांब कोलाडपासून तळवली, तिसे, भुवन, इंदापूरदरम्यान मोठ मोठे खड्डे पडल्याने त्यात वाहने अडकून बंद पडण्याच्या घटना घडत असल्याची बातमी कृषीवलमध्ये प्रकाशित होताच महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील खांब येथील दिपक धाबा ते गोमंतक हॉटेल, महिसदरा नदीवरील पूल, कुंडलिका नदीवरील पूल, कोलाड बाजारपेठ, कोलाड पोस्ट ऑफिससमोर, तिसे, तळवली, भुवन, इंदापूर या ठिकाणी रस्त्याला जीवघेणे खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांतून प्रवास करताना वाहने खड्ड्यात अडकून बंद पडत आहेत. अनेकदा अपघात होत आहेत. याबाबत कृषीवलने आवाज उठवला असता, प्रशासनाने याची दखल घेत महामार्गावील खड्डे तातडीने भरण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.







