जितेंद्र आव्हाडांचे उरणकरांना आवाहन
| उरण | प्रतिनिधी |
उरणची लेक भावना घाणेकर ही माझी लढणारी बहीण आहे. ती कोणापुढे झुकणारी नाही. ती 24 तास जनतेसाठी उपलब्ध असते. त्यामुळे तिला उरणकरांनी भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उरणकरांना व्हिडिओ कॉलद्वारे केले.
यावेळी आव्हाड यांनी स्थानिक आमदारांवर थेट निशाणा साधत विचारले की, गेल्या दहा वर्षांत उरणमध्ये नेमका काय विकास केला? एखादे ठोस काम उरणकरांसमोर दाखवता येईल का? आमदारांना जेएनपीटीची दलाली करण्याशिवाय दुसरे काही काम दिसते का? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या राजकारणात पैसा, विक्री, गद्दारी यांनाच महत्त्व मिळत आहे. निती, मूल्य, तत्त्वं या शब्दांची किंमत उरलेली नाही. उरणकरांनी या पैशाच्या राकारणाला थारा देऊ नये. तसेच, समाजात असा समज आहे की, राजकारणात स्त्री तेव्हाच पुढे जाते जेव्हा तिचा नवरा शक्तीशाली असतो. मात्र, भावना घाणेकर हा त्या समजाला खोडून काढणारा धडा आहे. तिच्या मागे उरणची जनता, शरद पवार, सुप्रिया सुळे, आमचा पक्ष आणि सर्व समविचारी पक्षांची ताकद आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.
दरम्यान, उरणच्या मस्जिद मोहल्ल्यात महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या उमेदवारांची सभा उत्साहात पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या मर्झिया पठाण उपस्थित होत्या. तर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा व्हिडिओ कॉलद्वारे जनता संपर्क साधला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी आमदार महेश बालदींवर तीव्र निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आपल्या उरणची कन्या यशश्री शिंदे हिचा मृत्यू झाल्यानंतर मंत्री नितेश राणे मुस्लिम समाजाला टार्गेट करत होते. त्यावेळी उरणचे आमदार एक शब्द बोलले नाहीत; मुस्लिम बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याची हिंमत दाखवली नाही. आता मात्र निवडणूक लागली म्हणून मुस्लिम मतांसाठी उर्दूमध्ये ‘दावत’ची पत्रके काढून राजकारण सुरू केले आहे. हा दांभिकपणा उरणकरांनी ओळखावा. तसेच, भाजप संपूर्ण देशभर ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणत समाजाला विभागत आली आहे. परंतु, उरणमध्ये आम्ही ‘जुडेंगे तो बढेंगे’ या विचाराने सर्व समाजांना साथ घेऊन विकासाचा मार्ग तयार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.







