निकृष्ट दर्जाचे काम; बांधकाम विभागाची कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चौल, वावे, बेलोशी येथील रस्त्यावरील संरक्षक भिंतीचा ठेका पेढांबेच्या सरपंचांचा मुलगा रोहित पाटील यांनी घेतला आहे. या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजपचे अलिबाग तालुकाध्यक्ष अशोक वारगे यांनी केला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत पाहणी करून काम थांबविण्यास सांगितले आहे. निविदेतील अटी-शर्तीनुसार काम केले नसल्याचा ठपका त्यांच्याविरोधात कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी ठेवला आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल, वावे, बेलोशी रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंतीचा ठेका रोहित पाटील या ठेकेदाराला देण्यात आला होता. 29 मार्च 2025 मध्ये कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला. या संरक्षक भिंतीचे काम करण्यासाठी निविदेप्रमाणे एम.20 ग्रेडची ठोस भराई करणे अपेक्षित होते. परंतु, याबाबत उपविभागातील कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता मोठे दगड टाकून ठोस भराईचे काम केले जात होते. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक वारगे यांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कामाची पाहणी केली. त्यावेळी काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे हे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा ठपका कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी ठेवला आहे. रोहित पाटील यांनी ज्या ज्या ठिकाणी कामे केली आहेत, त्या कामांची चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.







