| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी श्रीवर्धन येथे पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या शालेय सहलीच्या बसेस देखील मोठ्या प्रमाणात श्रीवर्धनमध्ये दाखल होत आहेत. त्यात पर्यटकांच्या खासगी वातानुकूलित बसेस, एसटी महामंडळाच्या लालपरी आणि इतर खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू आहे. परंतु, श्रीवर्धनमधील अरूंद रस्त्यांमुळे दोन मोठी वाहने पास होताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच, शहरात वाहनतळ उपलब्ध नसल्याने पर्यटक आपली वाहने जागा भेटेल तेथे उभी करत आहेत. परिणामी अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी असंख्य पर्यटक येत असतात. त्यातच सध्या शालेय सहलींचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी देखील लालपरीतून श्रीवर्धनमध्ये दाखल होत आहेत. सर्वाधिक पर्यटक हे श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी श्रीवर्धन पुर्णतः गजबजलेले असते. त्यामुळे व्यावसायिकांची चांदी होत असली तरी स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्रीवर्धन नगरपरिषद इमारतीपासून वाणी आळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान महावीर मार्ग आणि टिळक रस्ता या अरुंद रस्त्यावर बाजारपेठ आहे. येथील व्यापारी वर्गांची मालवाहतूक वाहने अनेक वेळा आपापल्या दुकानाजवळ उभी केलेली असतात. वाहनातील संपूर्ण सामान उतरवेपर्यंत वाहन एकाच जागेवर उभे राहिल्याने त्या कालावधीत वाहतूक कोंडी होते. तसेच, ग्राहक देखील आपल्या दुचाकी मिळेल त्या ठिकाणी उभ्या करीत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडते. त्यातच अरूंद रस्त्यांमुळे शालेय सहलीच्या बसेस तसेच पर्यटकांच्या स्लीपर कोच बसेस या वाहतूक कोंडीला निमित्त ठरत आहेत. त्यामुळे स्थानिकांना या वाहतुक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पोलीस वाहतूक नियमनाचे काम करीत आहे. त्याकरिता स्थानिक व पर्यटकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. शहराला रस्ता रुंदीकरण, बायपास रस्ता आणि वाहनतळ यांची नितांत आवश्यक आहे. त्याशिवाय वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकणार नाही.
-उमेश पाटील,
पोलीस निरीक्षक, श्रीवर्धन







