जिना चढ-उताराचा त्रास वाचणार
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील दिव्यांग आणि वृध्दांसह महिलांनादेखील तहसिल कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या सेतू केंद्रात जाण्यासाठी धक्का नसलेल्या जिना चढून जा-ये करण्याचा त्रास कमी करण्यासाठी तहसिलदार कपिल घोरपडे यांनी सेतू केंद्र आता जमिनीवर आणले आहे. सोमवारपासून या सेतू केंद्रामध्ये कामकाजाला सुरूवात करण्यात आल्याची माहिती संचालक श्रीकांत मालुसरे यांनी दिली.
पोलादपूर तहसिल कार्यालयामधील सेतू केंद्रामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अल्पभूधारक दाखला, नॉन-क्रिमिलेअर, शेतकरी प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना दाखला इत्यादींसाठी अर्ज करण्यासाठी तसेच विविध शासकीय परवाने मिळवण्यासाठी ऑॅनलाइन अर्ज भरणे, टोकन सिस्टीम, रिअल-टाइम स्टेटस तपासणे आणि अर्जदाराचा वेळ वाचवण्यासह सरकारी कार्यालयांमध्ये होणारी गर्दी आणि गैरसोय टाळणे तसेच आवश्यक सेवा घराच्या जवळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आबालवृध्द महिला पुरूष ग्रामस्थ येत असतात.
मात्र, गेल्या चार पाच वर्षांपासून पोलादपूर तालुक्यातील सेतू सेवा केंद्र तहसिल कार्यालयाच्या वरील मजल्यावर असल्याने शारिरीक त्रास असलेल्या नागरिकांना अवघड तसेच सुलभ नसल्याने गैरसोय वाटत असल्याचे दिसून आले. यामुळे पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी जुन्या ब्रिटीशकालीन तहसिल कार्यालयाच्या बेसमेंटवर पत्राशेडमध्ये सेतू केंद्र सुरू करण्यासाठी आकर्षक पत्राशेड उभारून सेतू सेवा केंद्राचे संचालक श्रीकांत मालुसरे यांना कामकाज जमिनीवर सुरू केल्यास नागरिकांची गैरसोय टाळणे शक्य होणार असल्याचे सुचविले. त्यानुसार सोमवार दि. 15 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्र शासनाचे सेतू सेवा केंद्र नव्या पत्राशेडमध्ये सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती संचालक श्रीकांत मालुसरे यांनी दिली.







