। पनवेल । प्रतिनिधी ।
कारची बुकिंग न करता बुक केली असल्याचे सांगून तिची डिलिव्हरी लवकर देण्याकरिता 6 लाख 9 हजार 290 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी करंजाडे येथील दिप्तेश गोरे याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खारघर येथील राजेंद्र नाकाडे यांनी ऑक्टोबरमध्ये कार बुक केली. यासाठी 21 हजार रुपये दिले. नोव्हेंबरमध्ये गाडीची डिलिव्हरी लवकर देण्यासाठी 1 लाख 29 हजार रुपये रोख दिले. नोकरी सोडून पसार झाल्यानंतर पुन्हा 50 हजार रुपये देण्यात आले. गाडीची डिलिव्हरी लवकर देतो, असे सांगून 8 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी 1 लाख 58 हजार 290 रुपये ऑनलाइनद्वारे घेतले. पावत्या मागितल्यावर त्या देण्यास टाळाटाळ करून फोन उचलणे बंद केले. त्यानंतर शोरूममध्ये फोन करून सदरचा प्रकार सांगितला. याबाबत मॅनेजरकडे चौकशी केली असता दिप्तेश याने घेतलेली रक्कम शोरूममध्ये जमा केलेली नसून तो पंधरा दिवसांपासून नोकरी सोडल्याचे समजले.







