ट्रेकसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं ‘अंधारबन’ हे सह्याद्री पर्वतरांगांतील एक अनोखं आणि निसर्गरम्य जंगल आजकाल पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. दाट झाडी, पायथ्याशी वाहणारे ओढे, सतत धुक्याने वेढलेलं वातावरण आणि जैवविविधतेने समृद्ध असा हा परिसर ‘निसर्गाच्या शांततेचं स्वर्ग’ म्हणून ओळखला जातो.
मुळशी तालुक्यातील पिंपरी गावातून सुरू होणारा अंधारबन ट्रेक सुमारे 13 ते 15 किलोमीटर लांबीचा असून, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील भिरा धरणाजवळ संपतो. हा ट्रेक उतारावरून चालणारा असून, सोपा ते मध्यम स्वरूपाचा मानला जातो. पावसाळ्यात या मार्गावरून जाताना धबधबे, ओढे, ढग आणि हिरवाई यांचा सुरेख समन्वय अनुभवता येतो. मात्र, या काळात मार्ग अत्यंत घसरडा असल्याने अनुभवी मार्गदर्शकासहच ट्रेक करणं सुरक्षित ठरतं.
अंधारबन जंगलात मोर, धनेश, बुलबुल, सूर्यपक्षी यांसारख्या पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजाती आढळतात. तसेच विविध प्रकारचे साप, सरडे, फुलपाखरं आणि औषधी वनस्पतींचे ही घनदाट अस्तित्व येथे आहे. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत क्वचितच पोहोचतो, म्हणूनच या जंगलाला ‘अंधारबन’ हे नाव प्राप्त झालं आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि नियमभंगामुळे अंधारबनच्या निसर्गावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. काही पर्यटक जंगलात कचरा टाकतात, जलप्रवाहात अंघोळ करतात, आणि प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतात. यामुळे वनविभागाने जबाबदार पर्यटनाचे आवाहन केले असून, पर्यटकांनी निसर्गाशी सुसंवाद साधत वागण्याची गरज अधोरेखित केली आहे.
संवर्धनासाठी वनविभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंधारबन स्वच्छता अभियान’ तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्ग शिक्षण शिबिरे’ आयोजित केली जात आहेत. अंधारबनचा पर्यटन विकास होत असला तरी निसर्गाची शांतता आणि जैविक समतोल अबाधित ठेवण्याचं आव्हान कायम आहे. अंधारबन ट्रेकसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य असून, पिंपरी गावात वाहन उभी करून पुढे एक किलोमीटर पायी चालत चौकीवर बुकिंग दाखवावे लागते. प्रत्येक वीस जणांच्या गटास एक अधिकृत मार्गदर्शक दिला जातो. प्लास्टिक वस्तू नेण्यास सक्त मनाई असून, पाण्याच्या बाटलीसाठी पन्नास रुपयांचे डिपॉझिट घेतले जाते, जे परतीच्या वेळी बाटली परत दिल्यावर मिळते. मद्यपान किंवा मद्य नेण्यास पूर्णतः बंदी आहे.
अंधारबन हे केवळ ट्रेकिंग पॉइंट नसून निसर्गाच्या कुशीतलं जिवंत संग्रहालय आहे. याची जपवणूक आणि संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यटन आणि पर्यावरण यांच्यातील समतोल राखत अंधारबनचं हिरवं, धुक्यातलं वैभव कायम ठेवणं हेच आजचं खरे आव्हान आहे.







