| अलिबाग | प्रतिनिधी |
आवास येथील थोर व्यक्तिमत्व तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांच्या 77 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि.13) सार्वजनिक वाचनालय अलिबाग येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रशांतजी नाईक यांनी तपस्वी रामजी घरत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. या मुख्य सोहळ्यास सार्वजनिक वाचनालय अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीरंग घरत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या अभिवादनानंतर, जनता शिक्षण मंडळाचे व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी श्रीफळ वाढवून श्रद्धांजली अर्पण केली.
वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, नगरसेवक प्रशांत नाईक, नगरसेविका साक्षी पाटील आणि नगरसेवक अनिल चोपडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, ॲड. गौतम पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. नागेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर श्रीरंग घरत यांच्या हस्ते सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ देण्यात आले.
या सोहळ्यास नागेश कुलकर्णी, चारुशिला कोरडे, रणजीता माळवी, बाबू नाईक, अरुण राऊत, विकास पाटील, नंदकुमार म्हात्रे, नवीन राऊत, हरिश्चंद्र सानप, अनंत सानप, पंकज घरत, किशोर घरत, अरविंद घरत, संतोष ठाकूर, समीर पुरो, यशवंत थळे, विपीन राऊत, अरुण पाटील, संजय कांबळे, जयेंद्र पाटील आणि श्रीरंग घरत, बळवंत वालेकर यांच्यासह पाठारे क्षत्रिय अष्टनगर समाज झिराड संस्थेचे सदस्य व पुतळा सुशोभीकरण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.







