| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील मतदारांना विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे प्रचंड राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, तालुक्यातील राजकीय पक्षांचा कल पाहता सद्यस्थितीत कोणतीही युती अथवा आघाडी होण्याची शक्यता अनेक वाटाघाटीनंतर दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी युती-आघाडीचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा दिसून येत आहे.
गेल्या महिन्यापासून पोलादपूर तालुक्यातील महाविकास आघाडीचे आणि शिवसेनाविरोधी गटबंधनाचे नेते एकत्रितपणे विचारमंथन करून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. अखेरिस सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. दि.16 व 17 जानेवारी रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये आतापर्यंत 16 जणांचे मागणी अर्ज दाखल झाले असून, 46 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसतर्फे 2, तर भाजप, शिवसेना,शेकाप, शिवसेना (उद्धव ठाकरे, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सहाही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष यांनीही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका सर्वसाधारण जागेवर उमेदवार देण्याची तयार केली असल्याची माहिती दिली. पहिल्या दोन दिवसांमध्ये 16 आणि 30 नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाल्यानंतर निवडणूक प्रशासनालाही किती पक्ष किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करतील याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







