नितीन पाटील ठरले शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान
| रेवदंडा | निलेश फुंडे |
महाबळेश्वरची ओळख असलेली स्ट्रॉबेरी आता थेट रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात फुलू लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि जिद्दीच्या जोरावर रोह्यातील एका तरुण शेतकऱ्याने शेतीला नवे वळण दिले आहे. पारंपरिक भात शेतीसोबत स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून लाखोंचे उत्पन्न मिळवणारे शेतकरी म्हणजे फुगारेवाडी (रोहा) येथील नितीन पाटील. त्यांची ही यशोगाथा आज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील फुगारेवाडी गावातील शेतकरी नितीन पाटील यांनी महाबळेश्वरच्या विंटर डॉन जातीच्या स्ट्रॉबेरीची यशस्वी सेंद्रिय लागवड करून शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. उष्ण कटिबंधीय हवामान असूनही ठिबक व स्प्रिंकल सिंचन पद्धतीच्या सहाय्याने त्यांनी सात एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक व सेंद्रिय खतांवर भर दिल्यामुळे त्यांच्या स्ट्रॉबेरीला चव, दर्जा आणि बाजारात मोठी मागणी आहे. गेल्या दोन महिन्यांतच स्थानिक बाजारपेठेत 65 ते 85 हजार रुपयांची विक्री झाली असून, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सरासरी चार पीके घेता येतात. त्यामुळे वर्षभरात लाखो रुपयांचे उत्पन्न सहज शक्य असल्याचे नितीन पाटील सांगतात. नितीन पाटील यांचा हा प्रयोग रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सेंद्रिय आणि स्मार्ट शेतीकडे वळल्यास शेती केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक यशस्वी व्यवसाय ठरू शकतो, हे या यशोगाथेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
भात शेतीसोबत स्ट्रॉबेरीचा यशस्वी संगम
नितीन पाटील यांनी पारंपरिक भातशेती सोडलेली नसून, स्ट्रॉबेरीसह फुलझाडे, फळझाडे, भाज्या आणि औषधी वनस्पतींचीही सेंद्रिय लागवड केली आहे. विविध पिकांचा अवलंब केल्यामुळे त्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.
कृषी विभागाचे कौतुक, शेतकऱ्यांचा उत्साह
रोहा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नितीन पाटील यांच्या बागेला भेट देऊन उत्पादनाची पाहणी केली आणि त्यांच्या प्रयोगाचे कौतुक केले. या यशामुळे फुगारेवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत 20 हून अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेला भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची माहिती घेतली असून, काहींनी प्रत्यक्ष लागवडही सुरू केली आहे.
महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही. योग्य नियोजन, काळजी आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास रोहा सारख्या भागातही स्ट्रॉबेरी यशस्वी होऊ शकते.
-नितीन पाटील,
शेतकरी







