। मुरुड । प्रतिनिधी ।
काशिद समुद्रात 24 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून, संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दुसऱ्या दिवशीही हा पर्यटक सापडला नाही. मुरुड पोलीस घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरू ठेवले आहे. बेपत्ता तरुणाचे नाव सोमनाथ राजेश भोसले (24) असे असून तो पुणे जिल्ह्यातील काळेपडळ, हडपसर येथील रहिवासी आहे. सध्या तो ता. शिर्डी, जि. अहिल्यानगर येथे वास्तव्यास होता.
सोमनाथ पुणे येथून रविवारी (दि. 18) आपल्या मित्रांसह सुप्रसिद्ध मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. पाण्याचा व लाटांचा अंदाज न आल्याने अचानक सोमनाथ समुद्रामध्ये बेपत्ता झाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडा ओरडा करत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही. सदर घटना मुरुड पोलीस स्टेशनला कळविण्यात आली आहे. घटनास्थळी मुरुड पोलिसांनी धाव घेत शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, दुसऱ्या दिवशीही सोमनाथ भोसले हा पर्यटक सापडलेला नाही. सदर घटनेचा तपास व शोधकार्य मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व शोध पथक शोध घेत आहेत.







