आर्थिक घटीमुळे अनेकदा फेऱ्या रद्द; टप्याटप्याने करावा लागतो प्रवास
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन-अलिबाग एसटी बस आर्थिक उत्पन्नात घट या कारणास्तव श्रीवर्धन आगाराकडून अनेक वेळा बंद करण्यात येते. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी वर्गाने आगारप्रमुखांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर श्रीवर्धन-अलिबाग बस ही काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. परंतु, अलिबाग स्थानकातून परतीची वेळ ही प्रवासी वर्गाच्या दृष्टीने गैरसोयीची ठरत आहे.
1987 मध्ये श्रीवर्धन आगाराची स्थापना झाल्यापासून श्रीवर्धन अलिबाग बससेवा सुरू आहे. पहाटे 5:45 वाजता श्रीवर्धन येथून मार्गस्थ होणारी बस म्हसळा, माणगाव, वडखळ मार्गे अलिबाग येथे पोहोचते व सायंकाळी 6 वाजता श्रीवर्धनकडे परतीच्या प्रवासाला निघत असे प्रशासकीय कार्यालयांचे मुख्यालय अलिबागमध्ये असल्याने श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सरकारी कर्मचारी आणि प्रवाशांसाठी ही बस उपयुक्त ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन अलिबाग बस पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सकाळी 5:45 वाजता मार्गस्थ होणाऱ्या या बसची परतीची वेळ ही दुपारी दोन वाजताची ठेवण्यात आली आहे. शासकीय कामानिमित्त आलेले कर्मचारी तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी वर्गाला ही वेळ गैरसोयीची ठरत आहे. अनेकदा शासकीय कामे पुर्ण होण्यास सायंकाळ होते. या कारणास्तव प्रवासी वर्गाला टप्याटप्याने प्रवास करीत यावे लागते. श्रीवर्धन आगाराची अलिबाग बस आमच्या सेवेसाठी नसून समाधानासाठी सुरू केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
अलिबाग स्थानकातून अलिबाग श्रीवर्धन अगोदर अलिबाग पोलादपूर बस सुटते. त्यामुळे माणगाव पर्यंत श्रीवर्धन बसला प्रवासी मिळत नाहीत.प्रवाशां अभावी दोनची वेळ केली.वेळेत केलेल्या बदलामुळे प्रवासी वर्गाला बस सोयीस्कर झाल्याने उत्पन्नात वाढ झाली.
-महिबूब मणेर
श्रीवर्धन आगारप्रमुख







