| चिरनेर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सायन्स असोसिएशनमार्फत विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तळोजा येथील श्रीकेम लॅबचे उपाध्यक्ष डॉ. व्यंकटेश कटगिरी हे कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवी मुंबईतील तळोजा, तुर्भे आणि पातळगंगा यांसारख्या मोठ्या औद्योगिक पट्ट्यांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या रोजगाराच्या संधी बाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कटगिरी यांनी सांगितले की, प्रशिक्षित असणे काळाची गरज आहे. उद्योग जगतात संधींचे सोने करायचे असेल, तर तरुण पिढी केवळ पदवीधर असून चालणार नाही. तर ती तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. त्यांनी औषध निर्माण कंपन्यांमधील संशोधन आणि विकास, उत्पादन विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण या विभागांतील कामकाजाची आणि तेथील नोकरीच्या संधींची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड काढून टाकावा आणि स्वतःच्या कौशल्यांवर काम करावे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून, कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी मिळविणे सोपे होते, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपप्राचार्य तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनिल पालवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी डॉ. गुरुमीत वाधवा, चेतना तुंबडे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






