| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात शेकापच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. विकासकामे करताना शेकापने अलिबागचे पर्यटन कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. अलिबागची खरी ओळख पर्यटन आहे. या दृष्टीनेच शेकापने लक्ष देऊन विकासावर भर दिला आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. प्रचाराच्या दरम्यान मतदारांकडून जनशक्तीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनशक्तीलाच मताधिक्कार मिळणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद चेंढरे मतदार संघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील उमेदवार एक उच्चशिक्षित आहेत. त्यांनी कोकण एज्युकेशन या शिक्षण संस्थेत 35 वर्षे सेवा केला आहे. हजारो विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात योगदान दिले आहे. समाजसेवेचा ध्यास असणाऱ्या प्रवीणा घासे यांचे पती प्रमोद घासे हे थळमधील आरसीएफ कंपनीमध्ये 37 वर्षे कार्यरत होते. नोकरी करीत असताना, ते सामाजिक कार्यात सहभागी होते. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना, सहकार क्षेत्रातही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिबागमधील रायगड बाजारसारख्या संस्थेत ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तर प्रविणा घासे यांनी नवगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही यशस्वी काम केले आहे. नवगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून काम करीत असताना मतदार संघातील गावातील अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रमोद घासे यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे प्रवीण घासे या घराघरात पोहचल्या आहेत.
जिल्हा परिषद चेंढरे मतदार संघातील उमेदवार म्हणून शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देऊन सेवेची एक मोठी संधी पक्षश्रेष्ठींसह जनतेने दिली आहे. या निवडणकीच्या प्रचारात शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मनमानी कारभार आणि धनशक्तीच्या राजकारणाला येथील जनता कंटाळली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. या निवडणूकीत जनशक्तीलाच मताधिक्कार मिळणार असा विश्वास प्रवीणा घासे यांनी व्यक्त केला आहे.
या मतदार संघाचा विकास अधिक वृद्धिंगत व्हावा, यासाठी एक वेगळा मानस आहे. चेंढरे हा अलिबागच्या अगदी जवळ असणारा मतदार संघ आहे. चेंढऱ्याचा विस्तार दिवसेंदिवस होत आहे. वेगवेगळ्या कामाबरोबरच शिक्षणासाठी चेंढऱ्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकीकरण झपाट्याने वाढत असताना गावांतील गावपण व पर्यावरण कायम राहिल याकडे अधिक लक्ष दिले जाईल. रस्ते, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देताना चेंढरेसह अनेक गावांची ओळख कायम जपण्याचा प्रयत्न केला जाईल. रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. निसर्ग व गावांचे सौंदर्य जपून विकास साधण्यावर भर देण्याचा मानस प्रविणा घासे यांनी व्यक्त केला.







