| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद गटातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसं राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत चाललं आहे. कोर्लई मतदारसंघात जनतेत सातत्याने राहून काम करणाऱ्या, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या मिसाळ कुटुंबाला भक्कम जनाधार मिळत असताना, दुसरीकडे घराणेशाही, राजकीय गणितं आणि दबावतंत्रावर अवलंबून असलेले मोहिते मात्र जनतेपासून दुरावत असल्याचं वास्तव समोर येत आहे. सत्ता, प्रकल्पविरोधाचं राजकारण आणि युतींचे हिशेब मांडून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न फसत चालल्याने या मतदारसंघात “मिसाळांना जनाधार, मोहिते निराधार” हे चित्र ठळकपणे उमटत आहे.
जुना उसरोली आणि आताचा कोर्लई जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे. या गटावर गेली अनेक वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम असून, ही राजकीय पकड अजूनही भक्कम असल्याचे चित्र आहे. या जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांपासून ते जनतेला भेडसावणाऱ्या रोजच्या समस्यांवर प्रशांत मिसाळ यांनी अचूक बोट ठेवत सातत्याने काम केले आहे. प्रश्न मांडून थांबण्याऐवजी त्यावर उतारे शोधत जनतेचा विश्वास त्यांनी टिकवून ठेवला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षानेही या कामांना ठाम पाठिंबा देत जनतेला वेळोवेळी दिलासा दिला आहे. त्यामुळे कोर्लई मतदारसंघात “मिसाळ” हे नाव केवळ उमेदवाराचं नव्हे, तर विश्वासाचं ब्रँड बनल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
दुसरीकडे, अर्थकारण करून केवळ मंदिरे, सभागृहे उभारून जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि मोहित्यांची जिंकण्याची “मनस्वी” इच्छा धुळीस मिळवण्यासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, या लढतीत शिंदे गटानेही भारतीय जनता पार्टीविरोधात दंड थोपटल्याचे चित्र कोर्लई मतदारसंघात पाहायला मिळत असून, ही निवडणूक केवळ स्थानिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 59 गटांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये मुरुड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. जुन्या उसरोली जिल्हा परिषद गटाचे कोर्लई हे नामकरण नव्याने करण्यात आले आहे. या गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. शिवसेनेचे दोन भाग झाल्यावर या मतदार संघात काही प्रमाणत बदल झालेला पाहावयास मिळाला आहे. या मतदार संघात राजश्री मिसाळ या रायगड जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वीदेखील निवडून आल्या आहेत. यामुळे या मतदार संघातील गावे आणि वाड्यांमधील मूलभूत गरजांची माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांचे पती प्रशांत मिसाळ यांच्या साथीने अनेक प्रश्न तडीस लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सर्वश्रुत आहे. प्रशांत मिसाळ आणि राजश्री मिसाळ यांच्या पाठीशी आता शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या अनुभवी कार्यकर्त्यांची फळी काम करीत आहे. यामुळे प्रचारामध्ये असणारी गती आणि घरोघरी पोहचून मतदारांचा संपर्क अंतिम टप्प्यात आहे.
दहा वर्षांपासूनचे स्वप्न भंगणार
या मतदार संघात आपल्याला निवडणूक लढवून जिल्हा परिषदेमध्ये निवडून जाण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे नेते महेश मोहिते यांनी गेल्या दहा वर्षांपूर्वीच पहिले आहे. मतदार संघात पडलेल्या आरक्षणामुळे त्यांचे स्वतःचे जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले. त्यांनी कोर्लई गटामधून त्यांच्या पत्नी ॲड. मनस्वी मोहिते यांची उमेदवारी पक्षाकडून मागून घेतली. त्यासाठी त्यांनी नेत्यांसमोर या मतदार संघाचे चित्र आपल्या बाजूने कसे आहे, हे रंगवून सांगितले. निवडणूक लढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघात प्रस्तावित असणाऱ्या बल्क फार्मा प्रकल्पाला सत्तेत राहून महेश मोहितेंनी विरोध करीत जनतेची मते जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला. काहीच जनता त्यांच्या सोबत राहिली. प्रकल्पाच्या आंदोलनात असलेल्या जनतेच्या उपस्थितीवरून त्यांनी या मतदार संघात उमेदवारी करण्यासाठीची केविलवाणी धडपड आजही सुरूच ठेवली आहे. ते शेवट पर्यंत जनतेला प्रकल्प येथून हद्दपार झाला आहे, असे सांगू शकले नसल्याने जनतेमध्ये त्यांच्याबाबतीत प्रचंड नाराजी पसरली आहे.
राजश्री मिसाळांचे पारडे जड
या गटामध्ये 12 ग्रामपंचायती आहेत. यापैकी सात ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे 2 ग्रामपंचायती, शेतकरी कामगार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडे प्रत्येकी 1 ग्रामपंचायत आहे. जरी या गटामध्ये सात ग्रामपंचायती शिंदे गटाकडे असल्यातरी उमेदवारी मिळवताना शिंदे गटामध्ये धुसफूस उडाली होती. शिंदे गटातील अंतर्गत राजकीय कलह पडद्याआड असला तरी त्या वादाचा फटका निश्चितपणे होणाऱ्या मतदानाला बसणार आहे. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये अंतर्गत कलहाची ठिणगी उडाली आहे. याउलट जनतेत राहून विकास करणाऱ्या, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजश्री मिसाळ यांचे पारडे जड असल्याचे या मतदारसंघात दिसून येत आहे.
आमदारांनी केला गेम
या मतदार संघात निवडून येण्यासाठी महेश मोहिते यांनी विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदारांच्या बाजूने काम केले. हे काम करताना जिल्हा परिषदेला मदत करण्याचा तह स्थानिक आमदार आणि महेश मोहिते यांच्यात झाला होता. हा तह करण्यामागे महेश मोहिते यांचा धुर्तपणा स्थानिक आमदारांनी ओळखला होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजप अशी युती न झाल्याने स्थानिक आमदारांनी आपले रंग दाखवीत महेश मोहितेंच्या पत्नी मनस्वी मोहिते यांच्या विरोधात शिंदे गटाकडून ज्योती नागवेकर यांची उमेदवारी जाहीर करून भाजपच्या जागेला शह दिला आहे.






