| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड-रोहा मार्गांवरील कोलाड नाक्यावरील द. ग. तटकरे चौका समोर मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्ता उखडल्याने याचा त्रास वाहन चालकांसहित प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे. गेली अनेक दिवसांपासून सदरच्या रस्त्याचा उखडलेला भाग त्याच स्वरूपात असल्याने कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर या उखडलेला खड्डा भरला जाईल का? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड-रोहा मार्गांवरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून रस्ता उखडला असून, या मार्गांवरून वाहन चालवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या ठिकाणी वाहने धिम्या गतीने चालवावी लागत असल्याने येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. मुरुड ते कोलाड ताम्हाणी मार्ग पुणे या महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अतिशय चांगले झाले असले तरी कोलाड-रोहा मार्गांवरील द. ग. तटकरे चौकासमोरील 200 मिटरच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आलेले नाही यामुळे या मार्गाच्या स्वागताला उखडलेला रस्ता अनेक वेळा भरला तरी भरेना! याचा नाहक त्रास वाहन चालकांसहित प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे. यामुळे हा 200 मिटरचा रस्ता सिमेंट काँक्रेटने करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.






