वाहतूक पोलिसांची कारवाई
। चिरनेर । वार्ताहर ।
जेएनपीटी बंदर परिसरात रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड कंटेनर ट्रेलरमुळे मोठ्या वाहतूक कोंडी व्हायची. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड वाहनांवर कायदेशीर ऑनलाईन दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने जेएनपीटी बंदर परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. जेएनपीटी बंदरात आयात-निर्यातीसाठी मालवाहतूक करणार्या अवजड कंटेनर ट्रेलर चालकांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या नित्याची झाली आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी जेएनपीटी बंदरातील रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे बंदराकडे जाणार्या वाहनांना मार्गक्रमण होण्यासाठी सोयीचे ठरत आहे.