| खेड | प्रतिनिधी |
जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. निसर्गसौंदर्य लाभलेल्या या नदीकिनाऱ्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या किनाऱ्यावरच पालिकेचे मटणमार्केट असून, त्यातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा येथेच फेकला जातो. त्यामुळे जगबुडी नदीकिनाऱ्यावर अस्वच्छता पसरली आहे. मात्र, याबाबत पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
मच्छीमार्केट इमारत उपलब्ध असतानाही बंदरमार्गाच्या दुतर्फा दररोज मासळी बाजार भरत असून, या मार्गाने ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना अडथळा शर्यत पार करावी लागते. जगबुडी किनाऱ्यावर अस्वच्छता, आरोग्यासाठी हानिकारक कचरा, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचा वाढता विळखा चिंतेची बाब आहे.
जगबुडी नदीवरील भोस्ते पुलालगत पालिकेने गणेश विसर्जन घाट व प्रेक्षक गॅलरी लाखो रुपये खर्च करून उभारून किनाऱ्याचे सुशोभीकरण केले आहे. मात्र, या गणेशघाटापासून अवघ्या काही फूट अंतरावर असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या व त्यामधून बाहेर पडून उघड्यावर शौचास बसतात. स्वच्छता अभियान राबविताना केवळ काही दिवसांकरिता दाखविलेला सुज्ञपणा प्रशासन व नागरिकांनीदेखील सोडून दिल्याचे निदर्शनास येत आहे. नदीकाठी पडलेला कचरा याची साक्ष देत आहे. पालिका प्रशासनाने मच्छी-मटणमार्केट उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत; मात्र त्या इमारतीत मासे विक्रेत्यांना बसविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मासळी खरेदीसाठी येथे येणारे याच मार्गाच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी झालेली दिसते, तर ग्राहकांची मासळी येथेच विक्रेते साफ करत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते.







