| पनवेल | प्रतिनिधी |
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह देशातील विविध ठिकाणांसाठी तब्बल 209 होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कुटुंबीय, नातेवाईक आणि प्रियजनांसोबत रंगांची उधळण करत होळी साजरी करता यावी, यासाठी हा विशेष रेल्वे बोनान्झा असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारतीय रेल्वेने यंदाच्या होळी उत्सवासाठी देशभरात एकूण 1410 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा मोठा वाटा असून, मुंबई-नागपूर- मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई तसेच अन्य महत्त्वाच्या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (एसी) विशेष गाड्या, वातानुकुलित सह शयनयान कोच असलेल्या गाड्या, तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय, अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारक्षित विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. प्रमुख स्थानकांवर तिकीट काउंटरची संख्या वाढवण्यात आली असून, गर्दीच्या काळात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळावी यासाठी उद्घोषणा प्रणाली आणि माहिती फलक अधिक प्रभावी करण्यात आले आहेत. स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि सुरक्षा यावरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार असून, होळीच्या काळातील गर्दीमुळे होणारी धावपळ आणि गैरसोय कमी होईल. विशेष गाड्यांच्या वेळापत्रकासह थांबे आणि आरक्षणासंबंधीची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. होळीच्या आनंदात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रेल्वेने उचललेले हे पाऊल प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असून, यंदाची होळी अधिक आनंदात आणि सुरक्षित प्रवासासह साजरी होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.






