। पनवेल । प्रतिनिधी ।
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बसून मद्यपान करण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने एका मद्यपीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना खारघर सेक्टर 7 येथे घडली. या हल्ल्यात एक पोलीस अंमलदार जखमी झाला असून, खारघर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. डीन डेविड रमेश (29) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक शशिकांत पाटील आणि पोलीस शिपाई चौरे हे खारघर सेक्टर 7 परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी डीन रमेश रस्त्यावर मद्यपान करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला मद्यपान करण्यास मज्जाव केला असता, त्याने पोलिसांशी वाद घालत पोलीस नाईक शशिकांत पाटील यांच्यावर हल्ला केला. या घटनेत एक पोलीस अंमलदार जखमी झाला. याप्रकरणी खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.







