भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या कसळखंड येथील स्वप्नील गायकरला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मतदानाची मोजणी पनवेल शहरातील व्हीके हायस्कूल केंद्रावर सुरू होती. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती. भाजपच्या उमेदवारांचा विजय होत असल्याने मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण सुरू होती. यावेळी अनेकांनी फलक फडकवले. यावेळी कशी जिरवली पुन्हा भेटू 2031 च्या निवडणुकीत हा आक्षेपार्ह फलक पोलिसांनी ताब्यात घेतला. यावेळी स्वप्निल गायकर याला पोलिसांनी घोषणा देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी खारघर येथील पोलीस निरीक्षक सूरज पाटील यांची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वप्निल गायकर याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात 9 फेब्रुवारी गुन्हा दाखल केला.






