विद्यार्थी कवी, कवयित्रींचे सादरीकरण
| चिरनेर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात मंगळवारी (दि.17) मराठीतील श्रेष्ठ कवी पु.शि. रेगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी कवी व कवयित्रींच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेच्या सहकार्याने, मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या संयुक्तपणे भरविलेल्या या कविसंमेलनाला ‘छांदसी’ हे नाव देण्यात आले होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात ग्रंथालय विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. गजानन चव्हाण यांनी ‘छांदसी’ हे शीर्षक निवडण्यामागील औचित्य स्पष्ट केले. त्यांनी पु.शि. रेगे यांचा ‘छांदसी’ हा समीक्षा-लेखसंग्रह मराठी साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असून त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत या काव्यसंमेलनाला तेच नाव देण्यात आल्याची माहिती दिली. रेगे यांच्या काव्यदृष्टि व समीक्षेच्या परंपरेत त्यांचे मोलाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर त्यांनी प्रभावीपणे उलगडले. या कविसंमेलनात काव्यवाचक म्हणून गजानन म्हात्रे, राम म्हात्रे, अपेक्षा गोसावी आणि शिवप्रसाद पंडित यांनी विविध विषयांवरील रचना सादर केल्या. विद्यार्थी कवयित्रींमध्ये समिधा रेवसकर, माही भोईर, हर्षदा महांकाळ आणि दौलत पाटील यांनी तरुणाईची स्वप्ने, जगण्यातील संघर्ष आणि निसर्गाशी असलेले भावबंध व्यक्त करणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.
विशेष निमंत्रित कवयित्री ऋतुजा म्हात्रे यांनी ‘चाफा’ या त्यांच्या आगामी काव्यसंग्रहातील तीन निवडक कविता सादर करताना ग्रामीण स्त्रीमन, ऋतुचक्र आणि घरगुती नात्यांतील नाजूक भावविश्व प्रभावीपणे उभे केले. कवयित्री स्वाती गोडे बांगर यांनी स्त्रीदास्य, परंपरा व आधुनिक संस्कृती यांतील ताणतणावांवर भाष्य करणाऱ्या, स्त्रीस्वातंत्र्याच्या जाणिवा अधोरेखित करणाऱ्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील होते. त्यांनी प्रत्येक कवीच्या काव्यवाचनातील भाषा, आशय आणि लय यांतील वैशिष्ट्यांवर मार्गदर्शनपर भाष्य केले आणि शेवटी स्वतःची आगरी बोलीतील ‘इवान’ ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या हस्ते सर्व निमंत्रित मान्यवरांचा स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. बळीराम पवार आणि मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.







