| पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचयतीत राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती सोमवारी (दि.23) साजरी करण्यात आली. पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्ष पराग मेहता, नगरसेवक सुधीर भालेराव यांनी संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केले. तसेच नगरपंचायती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी देखील संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीस अभिवादन केले. 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि स्वच्छतादूत संत गाडगे महाराज. स्वच्छता आणि माणुसकी हाच खरा धर्म मानणाऱ्या बाबांनी कीर्तनातून अंधश्रद्धा व जातिभेदावर प्रहार केले. महाराष्ट्रात स्वच्छतेचा संदेश, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण प्रसार आणि दीन-दलितांची सेवा करण्याचे त्यांनी कार्य केले. गोड बोलू नका, खरे बोला आणि माणसातच देव शोधा या विचारांचे गाडगे बाबा होते. हातात झाडू घेऊन त्यांनी गावोगावी स्वच्छता केली म्हणून त्यांना स्वच्छतेचे प्रतीक बोलले जाते. कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना शिक्षित व्हा, स्वच्छ रहा, असे प्रबोधनत्मक आवाहन करत असत. गाडगेबाबांची जयंती स्वच्छता दिन म्हणून साजरी केली जाते.






